भारत सरकार शेतकऱ्यांना कोणत्या कपाशीच्या बियाण्यांपासून वंचित ठेवत आहे ?

कृषी विद्यापीठांनी Bt कापसाचे रहस्य उलगडलेआणि तरीही शेतकऱ्यांना BT कपाशीचे सरळ वाणाचे बियाणे का मिळत नाहीत?

 

बी तयार आहे, विद्यापीठ तयार आहे, आणि शेतकरी वाट पाहत आहेत. मोदी सरकारची Bayer-Monsanto निष्ठा हाच एकमेव अडथळा आहे.” — राजन क्षीरसागर, अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा (AIKS)

 

वाचकांसाठी एक नोंद

जीएम पेटंटवरील भारताची कायदेशीर चौकट गुंतागुंतीची आहे. २०१९ मध्ये, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने BGII कापूस इव्हेंटवर Monsanto चे पेटंट पुनर्स्थापित केले – परंतु यामुळे सार्वजनिक विद्यापीठांना त्याच Cry1Ac आणि Cry2Ab जनुकांचा वापर करून त्यांचे स्वतःचे वेगळे BT इव्हेंट विकसित करण्यापासून किंवा प्रकाशित करण्यापासून रोखता येत नाही. अशा BT कपाशीच्या चौदा सरळ वाणाच्या जाती आधीच अस्तित्वात आहेत. मुख्य अडथळा केवळ पेटंट तरतुदी नाही तर राजकीय इच्छाशक्ती आणि अपुऱ्या बीज गुणन सुविधा हा आहे.

₹१०,००० कोटींचा सापळा

भारत जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे. तसेच जगातील सर्वात जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांची  पिळवणूक करणारा प्रदेश बनला आहे. महाराष्ट्र, पंजाब, तेलंगणा, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश यासह 11 राज्यातील सहा कोटी कापूस शेतकरी कुटुंबांना प्रत्येक खरीप हंगामात नव्याने कपाशीचे संकरित बियाणे खरेदी करावे लागते. संकरीत वाणाचे बियाणे साठवून पुन्हा लागवडीसाठी वापरता येत नाही. कापूस लागवडीसाठी ४५० ग्रॅमच्या बियाणे पाकिटाला ₹९०१ या दराने, दरवर्षी सुमारे 130-140  लाख हेक्टरवर हि सक्तीची वार्षिक खरेदी अंदाजे दहा हजार कोटीच्या घरात आहे.

१०,००० कोटी दरवर्षी BayerMonsanto, Nuziveedu Seeds, Kaveri Seeds, Rasi Seeds यांसारख्या मूठभर खाजगी कंपन्यांच्या तिजोरीत जमा होतात. या मुठभर बियाणे कपन्यांनी एकत्रित रित्या भारतीय कापूस बियाणे बाजारपेठेवर ९५% पेक्षा अधिक कब्जात घेतला आहे.

खरे तर हा बाजार नाही. हि मक्तेदारीच्या जोरावर केलेली खंडणी वसुली आहे.  वादग्रस्त आणि तकलादू कायदेशीर तरतुदीवर हि वसुली सुरु आहे.

 

पेटंट जे कधी अस्तित्वातच नव्हते?

2015-16 मध्ये, शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्या पत्राला उत्तर देताना कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले की Cry1Ac जनुक (Monsanto च्या पहिल्या पिढीतील BT कापसाचा गाभा) यावर भारतात कधीही सदर कंपनीचे पेटंट अधिकार अस्तित्वात नव्हते. हि वस्तुस्थिती सरकारने मान्य केली. याबद्दल शासनाने 2016 मध्ये असे दिसते की या विशिष्ट जनुकासह किंवा इतर जनुकांसह Bt कापूस बिया आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वेळीच कारवाई करू शकलो नाही.” असे प्रतिपादन कृषी मंत्रालयाने केले आहे. हा पेटंटचा अधिकार नसतानाच Monsento कंपनीने पेटंटचा मोबदला म्हणून प्रत्येक पाकिटामागे पहिल्यांदा प्रति पाकीट २००२ ते २०१६ या कालावधीत रु १८३/- तर २०१६ ते २०१९ या कालावधीत रु ४९/- या प्रमाणे सुमारे 8000 कोटी रुपये उकळले आहेत. या बाबत डी मार्च २०१६ रोजी संसदेत गंभीर वादळी चर्चा देखील घडल्या आहेत

परंतु हि बाब तिथेच संपली नाही. २०१८ मध्ये, दिल्ली उच्च न्यायालयाने दुहेरी-जनुक BGII तंत्रज्ञानावर Monsanto चे पेटंट रद्द केले. मात्र जानेवारी २०१९ मध्ये, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव ते पेटंट पुनर्स्थापित केले. त्यामुळे, Cry1Ac जनुक स्वतंत्रपणे पेटंटमुक्त राहिले असले, तरी व्यावसायिक BGII इव्हेंट अजूनही पेटंट संरक्षणाखाली आहे.

शेतकऱ्यांसाठी, या कायदेशीर उलट-सुलट घडामोडींमुळे गोंधळ निर्माण झाला खरा परंतु महत्त्वाचे म्हणजे, यामुळे कृषी विद्यापीठांना कोणताही अडथळा येत नाही. त्यांना त्याच जनुकांचा वापर करून त्यांचे स्वतःचे रूपांतरण इव्हेंट विकसित करण्याचे आणि प्रकाशित करण्याचे रॉयल्टीमुक्त  स्वातंत्र्य आहे. याच आधारे कृषी विद्यापीठांनी पेटंटमुक्त व रॉयल्टीमुक्त बियाणे संशोधन चालविले.

दहा वर्षे, चौदा मुक्त सरळ वाण कापूस बियाणे प्रजाती वर यशस्वी संशोधन

२०१४ ते २०२५ दरम्यान, भारतीय कृषी विद्यापीठे आणि केंद्रीय संशोधन संस्थांनी म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील संशोधन संस्थांनी सर्व आवश्यक व्यावसायिक परवानग्यांसह चौदा पेटंटमुक्त, खुल्यापरागीकरण सरळ वाणाच्या BT कापूस प्रजाती विकसित केल्या. त्यांपैकी कोणत्याही प्रजातीसाठी पुन्हा पुन्हा दरवर्षी बियाणे खरेदी आवश्यक नाही. सदर बियाण्यांचा पुनर्वापर दोन ते तीन हंगामांसाठी सहजपणे करता येवू शकेल आणि पुन्हा पेरता येतात. सदर किमतीत कार्पोरेट बियाणे कंपन्यांचा पेटंट मोबदला समाविष्ट नसल्याने सर्वांची किंमत १५०२०० प्रति किलो आहे ती कॉर्पोरेट संकरित वाणांच्या ,०००/किलो च्या तुलनेत केवळ 10% पेक्षा देखील कमी आहे ! यामुळे शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात कपात होवू शकते.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची नोंद: या सरळ वाणाच्या प्रजाती बीजपुनर्वापरयोग्य असल्या तरी, योग्य निवड आणि चांगल्या साठवणुकीशिवाय बियाणे साठवल्यास तिसऱ्या हंगामात उत्पादन क्षमता १०१५% घसरू शकते. सार्वजनिक विद्यापीठे यावर प्रशिक्षण देतातपरंतु ते प्रशिक्षण अजून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करणे आवश्यक आहे. आपल्या गावात त्याची मागणी करा.

 

पंजाब कृषी विद्यापीठ (PAU), लुधियाना
PAU ने दोन पिढ्यांमधील सरळ कापूस वाणाच्या चार प्रजातींसह कृषी विद्यापीठ स्तरीय संशोधनाचे जणू नेतृत्वच केले आहे. प्रामुख्याने उत्तर भारतीय हवामान व बागायती वाण त्यांनी 4 वेगवेगळे वाण विकसित केले. याचे विवरण पुढील प्रमाणे आहे 1) PAU Bt 1 (जनुक BGI, वर्ष २०१७, सरासरी उत्पादन २,८१२ किग्रॅ/हे) – भारतातील पहिला सार्वजनिक पेटंटमुक्त सरळ BT वाण; non-BT पेक्षा ~१६% अधिक; बागायत वाण. 2) F1861 (जनुक BGI, वर्ष २०१७, उत्पादन १,७५१–२,४५४ किग्रॅ/हे) – CICR सह विकसित; उत्तर विभाग. 3) PAU Bt 2 (जनुक BGII, वर्ष २०२२, उत्पादन २,९०५ किग्रॅ/हे) – दुहेरी-जनुक; तुलनापेक्षा २०.६% अधिक; बागायत वाण. 4) PAU Bt 3 (जनुक BGII, वर्ष २०२२, उत्पादन २,८४० किग्रॅ/हे) – दुहेरी-जनुक; तुलनापेक्षा १७.९% अधिक; बागायत वाण.

२०१६ पर्यंत, गुलाबी बोंड अळीने भारताच्या बहुतांश भागात एक-जनुक आधारित BGI वाणावर विरुद्ध प्रतिकार विकसित केला होता. या दुहेरी-जनुक सार्वजनिक जातींनी शेवटी परवडणारे दोन-जनुक संरक्षण उपलब्ध केले, आज ज्यासाठी शेतकरी Bayer कडून ₹९०१ प्रति पाकीट देत होते.

राजस्थान कृषी विद्यापीठ (RAU), बीकानेर : CICR सोबत, RAU ने २०१७ मध्ये RS 2013 (RAU2013) विकसित केली – हरयाणा आणि पंजाबमधील बागायती क्षेत्रासाठी ~२,२३४ किग्रॅ/हेक्टर उत्पादन देणारी BGI सरळ जात.

ICAR केंद्रीय कापूस संशोधन संस्था (CICR), नागपूर: प्रामुख्याने महाराष्ट्राचे हवामान आणि कोरडवाहू क्षेत्र या उद्देशाल समोर ठेवून CICR ने २०१९ मध्ये चार सरळ BT जाती विकसित केल्या  केल्या: 1) ICAR-CICR GJHV 374 Bt (जनुक BGI, उत्पादन २,५२५ किग्रॅ/हे) – महाराष्ट्र राज्याच्या कृषी पर्यावरणासाठी अत्यंत अनुकूल .2) Suraj Bt (जनुक BGI, उत्पादन २,२००–२,७५४ किग्रॅ/हे) – ७४  झाडे/या घनतेवर सर्वोत्तम. 3) Rajat Bt (जनुक BGI) – महाराष्ट्र विभाग. 4) PKV 081 Bt (जनुक BGI, उत्पादन २,६३९ किग्रॅ/हे) – घनता चाचण्यांत सर्वोत्तम; PDKV, अकोला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV), परभणी: महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या कृषी विद्यापीठाने सर्वात अलीकडे आणि सर्वात महत्त्वपूर्ण कपाशीचे पाच प्रकारचे सरळ वाण विकसित केले आहेत. प्रामुख्याने कोरडवाहू शेतकरी केंद्रस्थानी ठेवून हे वाण विकसित करण्यात आले आहेत.   1) NH 1901 Bt (जनुक BGI, वर्ष २०२३, उत्पादन १,४००–१,६०० किग्रॅ/हे) – कोरडवाहू; मध्य विभाग मंजुरी. 2.) NH 1902 Bt (जनुक BGI, वर्ष २०२३) – कोरडवाहू; मध्य विभाग. 3) NH 1904 Bt (जनुक BGI, वर्ष २०२३, उत्पादन १,३००–१,५०० किग्रॅ/हे) – कोरडवाहू; मध्य विभाग. 4) NH 22037 Bt BG II (जनुक BGII, वर्ष २०२५, उत्पादन १,८००–१,९०० किग्रॅ/हे) – कोरडवाहू, उच्च-घनता; भारतातील पहिली सार्वजनिक कोरडवाहू BGII सरळ जात. 5) NH 22038 Bt BG II (जनुक BGII, वर्ष २०२५, उत्पादन १,८००–१,९०० किग्रॅ/हे) – कोरडवाहू, उच्च-घनता; १६०–१७० दिवसांची परिपक्वता.

वनामकृवि ने विकसित केलेल्या कपाशीचे वाण कोरडवाहू जाती, सिंचनाशिवाय १,४००–१,९०० किग्रॅ/हेक्टर उत्पादन देतात, म्हणजे त्या राष्ट्रीय सरासरीच्या तीन ते चार पट आहेत – आणि बहुतांश महाराष्ट्रातील शेतकरी प्रत्यक्षात ज्या परिस्थितीत शेती करतात, त्यासाठी त्या विकसित केल्या आहेत.

उत्पादनाचे वास्तव: कॉर्पोरेट अंतर कमी करणे
खाजगी बियाणे कंपन्या असा युक्तिवाद करतात की त्यांचे संकरित सार्वजनिक जातींपेक्षा लक्षणीयरित्या अधिक उत्पादन देतात. मात्र प्रत्यक्षात जगभरातील अनुभव वेगळेच चित्र पाहायला मिळते कपाशीचे सरळ वाण जास्त प्रमाणात लागवडीत असलेल्या चीन, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, तुर्की, उझबेकिस्तान, सुदान या देशात सरासरी हेक्टरी 1400 किलो पासून 2170 किलो आहे. आणि भारतात जिथे 95% पेक्षा जास्त कार्पोरेट कंपन्यांच्या संकरित वाणांची लागवड केली तिथे आज घडीला सरासरी प्रति हेक्टर 2023-25 कालावधीत केवळ ४६५ किग्रॅ/हेक्टर आहे. हे उत्पादन गेल्या 10 वर्षात घसरणीला लागले आहे.

प्रत्यक्षात खाजगी कार्पोरेट क्षेत्राने केलेले उत्पादकतेचे दावे आणि कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था यांचे निष्कर्ष याबद्दलचा खालील माहिती वेगळी वस्तुस्थिती स्पष्ट करीत आहे. याबद्दल तक्ता खाली दिला आहे. त्यबद्दल पुढील निष्कर्ष.

संपूर्ण तुलनात्मक डेटा अधिक गुंतागुंतीची गोष्ट सांगतो:

  • PAU Bt 2 – विकसनकर्ता PAU, प्रकार सार्वजनिक सरळ, उत्पादन २,९०५ किग्रॅ/हे, जनुक
  • PAU Bt 3 – विकसनकर्ता PAU, सार्वजनिक सरळ, २,८४० किग्रॅ/हे, BGII.
  • PAU Bt 1 – विकसनकर्ता PAU, सार्वजनिक सरळ, २,८१२ किग्रॅ/हे, BGI.
  • PKV 081 Bt – विकसनकर्ता CICR/PDKV, सार्वजनिक सरळ, २,६३९ किग्रॅ/हे, BGI.
  • CICR GJHV 374 Bt – विकसनकर्ता CICR, सार्वजनिक सरळ, २,५२५ किग्रॅ/हे, BGI.
  • MRC 7918 – विकसनकर्ता Mahyco/MMB, खाजगी संकरित, २,५४६ किग्रॅ/हे, BGII.
  • KCH311 BG II – विकसनकर्ता Kaveri Seeds, खाजगी संकरित, २,३१४ किग्रॅ/हे, BGII.
  • RCH 134 (शेत सरासरी) – विकसनकर्ता Bayer, खाजगी संकरित, २,१०७ किग्रॅ/हे, BGII.
  • MRC 7361 (चाचणी कमाल) – विकसनकर्ता Mahyco/MMB, खाजगी संकरित, ३,१२२ किग्रॅ/हे, BGII.
  • RCH 134 (चाचणी कमाल) – विकसनकर्ता Bayer, खाजगी संकरित, ३,१२० किग्रॅ/हे, BGII.

 

चार निष्कर्ष:

  • अग्रेसर सरळ वाण कापूस प्रजाती (PAU Bt 2, २,९०५ किग्रॅ/हेक्टर) खाजगी संकरित कमाल उत्पादनापेक्षा केवळ ७% कमी आहेत – आणि RCH 134 च्या २,१०७ किग्रॅ/हेक्टर सारख्या प्रत्यक्ष शेत सरासरीशी पूर्णपणे स्पर्धात्मक आहेत.
  • कॉर्पोरेट कंपन्याकडून येणारे बियाणे उत्पादनाच्या चाचणी घेताना प्रत्यक्षात  अनुकूलित परिस्थिती उपलब्ध केली जाते, जसे सिंचन, खते व औषधांची मात्र प्रात्यक्षिक भूखंडांमधून घेतली जाते तर दुसरीकडे कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांच्या बियाणे उत्पादनाच्या चाचण्या सामान्यतः प्रत्यक्ष शेतीवर नोंदविला जातो. ही तुलना पक्षपाती ठरू शकते आहे. कॉर्पोरेट कंपन्याकडून केलेलं दावे जास्तीचे असू शकतात.
  • खाजगी कंपन्या बियाण्याच्या कमाल उत्पादन क्षमतेवर हे बियाणे शेतकऱ्यांना विकतात; शेतकऱ्यांच्या पदरी मात्र प्रत्यक्षात सरासरी पडत असते. आणि तेही दरवर्षी ₹९०१ प्रति पाकीट देऊन, बी साठवण्यासाठीचा कोणताही पर्याय नसताना.
  • कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी: नव्या सार्वजनिक BGII कोरडवाहू जाती (NH 22037, NH 22038) कोरडवाहू चाचण्यांमध्ये खाजगी संकरितांपेक्षा प्रत्यक्षात अधिक उत्पादन देतात. आपल्या कोरडवाहू शेतांसाठी अशा बियाणांची गरज आहे.

 

मान्यताप्राप्त झालेले सरळ वाणाचे हे संशोधित बियाणे शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचत नाहीत?

वरील संशोधित सर्व चौदा जातींच्या कापूस बियाण्यांना GEAC किंवा केंद्रीय/राज्य विविधता वाणाला मजुरी देणाऱ्या समित्यांद्वारे आवश्यक व्यावसायिक परवानग्या मिळाल्या आहेत. तरीही २०२४–२५ पर्यंत, एकही सरळ वाण मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. या बाबत अखिल भारतीय किसान सभेने केलेल्या पाहणी मध्ये पुढील बाबी आढळून आल्या.

नियामक विलंब आणि धोरण समर्थनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत.”

सर्व राज्य बीज महामंडळांपैकी – Mahabeej (महाराष्ट्र), पंजाब स्टेट सीड्स कॉर्पोरेशन, गुजरात, कर्नाटक यापैकी केवळ Mahabeej ने सरळ वाण कापूस बियाण्याचे व्यावसायिक उत्पादन करण्याची तयारी दर्शविली मात्र ती देखील अपुरीच. २०१९ मध्ये, CICR ने चार CICR जातींच्या मोठ्या प्रमाणावरील गुणनासाठी Mahabeej सोबत सामंजस्य करार केला. सहा वर्षांनंतर, पथदर्शी प्रात्यक्षिकांच्या पलीकडे हे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचा कोणताही पुरावा नाही. Mahabeej ची प्रत्यक्ष BT कापूस बियाणे विक्री Mahyco-Monsanto उपपरवान्याअंतर्गत संकरित बिया विक्री केल्या प्रत्यक्षात  कृषी संशोधनातून पुढे आलेला सरळ वाण नाहीत.

 

विलंबाची खरी रचना (चार स्तंभ)

. नियामक अडथळे, पण तुम्हाला वाटते तसे नाही

मंजुरीपासून व्यावसायिक उपलब्धतेपर्यंतचा मार्ग पायाभूत बीज गुणन आणि प्रमाणित बीज उत्पादनातून जातो. एक सरळ Bt वाण संशोधन विकासापासून शेतकऱ्यांच्या हाती पोहोचण्यासाठी पाच ते सात वर्षे लागू शकतात. जर सरकारच्या सर्व साखळी संस्थांनी वेळेवर कारवाई केली तरच ! . त्यांनी केलेली नाही हि वस्तुस्थिती आहे.

. मोडकळीस आलेली बियाणे महामंडळे पायाभूत सुविधा

विविध राज्यांच्या व केंद्र सरकारच्या बीज महामंडळे अपुऱ्या निधीची तरतुदींमुळे आणि खाजगी करणाच्या भानामतीने, अडचणीत आहेत. धान्य आणि कडधान्यांकडे परिचालनात्मकदृष्ट्या केंद्रित, आणि सरळ Bt कापूस वाणासाठी साठी विशेष निधीची तरतूद नाही, बीज गुणन क्षमता किंवा वितरणाचे प्रभावी जाळे  याची वानवा आहे.

. बियाणे बाजार पेठ कब्जात ठेवण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांचा आक्रमक बाजार पावित्रा

खाजगी क्षेत्र कापूस बियाणे बाजारावर ९५% नियंत्रण ठेवतो आणि खुल्या-परागीकरण सरळ जाती मोठ्या प्रमाणावर होण्यापासून रोखण्यासाठी त्याला प्रत्येक आर्थिक प्रोत्साहन आहे. जर शेतकरी दोन ते तीन हंगामांसाठी बिया साठवू शकले, तर ₹१०,००० कोटींची वार्षिक बाजारपेठ मोडीत निघू शकते. त्यांची साधने: सरकारी यंत्रणेवरील प्रभाव आणि लॉबिंग, रिटेल नेटवर्क नियंत्रण, जाहिराती द्वारे शेतकऱ्यांच्या मनावर ब्रँड ची भानामती !.

. GEAC (Genetic Engineering Appraisal Committee) जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समिती

हे खरे आहे की खाजगी BGII संकरित वाणांना २००६–०७ मध्ये मंजुरी मिळाली, तर सार्वजनिक BGII सरळ वाणाच्या प्रजाती केवळ २०२२ मध्ये आल्या. तथापि, भारताने २००६ मध्ये इव्हेंटआधारित जलदगती प्रणाली सुरू केली जी सर्व अर्जदारांना – सार्वजनिक संशोधन किंवा खाजगी कंपन्या यांना लागू होती. किंबहुना, पहिला सार्वजनिक सरळ BT वाण (CICR ची बीकानेर नरमा BN BT) GEAC ने २००८ मध्येच मंजूर केली होती. सार्वजनिक BGII जातींसाठी खरा विलंब GEAC पक्षपातामुळे नव्हता, तर सार्वजनिक संशोधकांनी नंतरच स्वतःचे BGII इव्हेंट विकसित केले आणि त्यांना अपुऱ्या निधीच्या गुणनाला सामोरे जावे लागले.  सरकारने आधीच मंजूर असलेल्या सरळ वाणांच्या जातींच्या पश्चात-मंजुरी बीज गुणनासाठी निधी देण्यात अपयशी ठरले.

 

२२ एप्रिल २०२६: अखिल भारतीय किसान सभेचे शिष्टमंडळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे मागणी करण्यासाठी भेटले – आणि अंतिम मुदत निश्चित केली

२२ एप्रिल २०२६ रोजी परभणीत, किसान सभेच्या च्या शिष्टमंडळाने VNMKV कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांची भेट घेतली. त्यांनी सर्व पाच वनामकृवि द्वारे विकसित सरळ Bt कापूस प्रजातींसाठी (NH 1901, 1902, 1904, 22037, 22038) बियाणे उपलब्धता आणि शेतकरी प्रशिक्षणाची आग्रह धरला आणि विद्यापीठाने तत्काळ वचनबद्धता केली. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की त्यांनी आधीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना व्यावसायिक प्रकाशनाची विनंती प्रत्यक्ष भेटीमध्ये देखील केली आहे.

हीच वस्तुस्थिती एक गंभीर बाब आहे. एका कुलगुरूला आपल्याच संस्थेने, सार्वजनिक निधीतून, आपल्याच प्रदेशातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विकसित केलेल्या बिया वितरित करण्यासाठी केंद्र सरकारकडे याचना करावी लागते. विज्ञान-तंत्रज्ञान पूर्ण झाले आहे. नियामक काम पूर्ण झाले आहे. संस्था तयार आहे. एकमेव हरवलेला घटक म्हणजे  केंद्र सरकारची राजकीय इच्छाशक्ती आहे.

नोंद: भारतीय कायदा आधीच राज्य सरकारांना अत्यावश्यक वस्तू कायदा आणि राज्य बीज महामंडळांद्वारे या बियाणे खरेदी करण्याचा आणि वितरित करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभाव हेच मुख्य कारण आहे.

अखिल भारतीय किसान सभेने ने विद्यापीठातील संशोधकांनी शेतकऱ्यांशी असलेल्या निष्ठेबद्दल अभिनंदन केले आणि बियाणे उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेचे स्वागत केले.

– आणि VNMKV कृषी विद्यापीठाने ने परभणीतील खरीप मेळाव्यात (१८ मे २०२६) औपचारिक, नोंदणीकृत जाहीर घोषणा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. २०२६ खरीप हंगामासाठी बीजगुणन करण्यासाठी फौंडेशन बियाणे तात्काळ पुरवठ्याची मागणी केली.

 

केंद्र शासनाकडे किसान सभेच्या अग्रक्रमाच्या मागण्या

  • सर्व शासकीय कृषी विद्यापीठ आणि संशोधन संस्था यांनी विकसित केलेले सरळ Bt कापूस वाणांचे राष्ट्रीय सार्वजनिक वस्तू म्हणून त्वरित देशव्यापी वितरण – पुढील कोणत्याही मंत्रिमंडळीय अनुमतीची आवश्यकता त ठेवता लागू करा.
  • सरळ Bt कापूस वाणांची किंमत २००/किलो ची निश्चित करा आणि कृषी विस्तार सेवा मार्फत वितरण व्यवस्था अमलात आणा 
  • जलदगती नियामक मंजुरी – GEAC मध्ये एक खिडकी द्वारे सुरक्षित सिद्ध झालेल्या संशोधनांचा पूर्ण जैव-सुरक्षा आढावासह कमी वेळात निपटारा करा.,
  • प्रत्येक प्रमुख कापूस राज्यात राज्य बीज महामंडळांकडून कापूस बियाणे उत्पादनाच्या किमान १०% अनिवार्य वाटप सरळ Bt जातींसाठी.
  • अभियानपद्धतीने बीज गुणन आणि वितरण कार्यक्रम खरीप हंगामापूर्वी राबवा त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करा.
  • वनस्पती जाती आणि शेतकरी हक्क संरक्षण (PPV&FR) कायदा, २००१  याच्याशी विसंगत असणारे भारत- अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपीय युनियन यांच्या सोबतचे व्यापार करार  रद्द करा

 

सरकारचे कार्पोरेट हितसंबंधाना प्राधान्य

२०१६ च्या पेटंट स्पष्टीकरण आणि २०२६ च्या निष्क्रियतेमधील अंतर नऊ वर्षे आहे. त्या नऊ वर्षांमध्ये: कोणताही अभियान-पद्धती कार्यक्रम सुरू झाला नाही; सरळ वाणाच्या  प्रजातींवर कोणतीही किंमत मर्यादा अनिवार्य केली गेली नाही; राज्य बीज महामंडळांना कोणतेही निर्देश गेले नाहीत; आधीच मंजूर सार्वजनिक जाती वाढवण्यासाठी कोणताही निधी वाटप झाला नाही.

त्याच काळात, Bayer ने २०१८ मध्ये Monsanto चे अधिग्रहण केले, जागतिक बियाणे बाजारावर आपली पकड आणखी घट्ट  केली. जेव्हा मोदी सरकारने २०१६ मध्ये Bt कापूस बियाणे किमती नियंत्रित करण्यासाठी अत्यावश्यक वस्तू कायदा लागू करण्याची धमकी दिली, तेव्हा Monsanto ने भारत सोडण्याची धमकी दिली. सरकार मागे सरले. – एका हंगामासाठी किंमत मर्यादा लावली, परंतु त्यानंतरच्या कायदेशीर आव्हानांमुळे ती कमकुवत होऊ दिली. नियमन यंत्रणांनी वारंवार आणि सातत्याने, कॉर्पोरेट दबावाखाली माघार घेतली.

BayerMonsanto च्या स्वतःच्या BGII तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना जबरदस्तीने अडकवले आणि  – २०१६ लाच त्याचा बोजवारा उडाला. जेव्हा गुलाबी बोंड अळीचा प्रतिकार करण्यात या कंपनीचे BGII  तंत्रज्ञान अयशस्वी झाल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले त्यानंतर कंपनी आणि सरकारने. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होण्यसाठी वाऱ्यावर सोडले. मात्र बियाण्यांच्या किमती वाढतच राहिल्या.

 कॉर्पोरेट नफ्याचे रक्षण करण्यासाठी सरकारच शेतकऱ्यांच्या मुळावर !

 

मोठा प्रश्न: बीज सार्वभौमत्व – भारतीय कायद्यासह

भारताचे सरासरी कापूस  उत्पादन केवळ ४६५ किग्रॅ/हेक्टर हे उत्पादकतेचे अपयश नाही. तर कॉर्पोरेट संकरित बियाण्याच्या आधारे भारतीय शेतकरी प्रगती करतील, या गृहीतकाचे हे खंडन आहे. महाराष्ट्राचा कापूस पट्टा जिथे वीस वर्षात हजारो शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होवून आत्महत्या केल्या आहेत त्यामागे कार्पोरेट दबावाखाली चुकीची निवड शेतकऱ्यांवर लादली हे हि एक मोठे कारण आहे. सरकारी धोरणाने  पद्धतशीरपणे  जोखीम शेतकऱ्यांकडे माथ्यावर मारली आणि मुनाफा कंपन्यांच्या घश्यात घातला. अश्या हितसंबंधांना भारताच्या सार्वजनिक संशोधन प्रणालीचे वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित उत्तर म्हणजे सरळ वाणाच्या कापूस प्रजाती आहे.

आणि भारताकडे आधीच एक शक्तिशाली शेतकरीहक्क कायदा आहे. भारतीय संसदेने पारित केलेला वनस्पती जाती आणि शेतकरी हक्क संरक्षण (PPV&FR) कायदा, २००१ प्रत्येक भारतीय शेतकऱ्याला  – त्याचे शेत उत्पादन बियासह साठवणे, वापरणे, पेरणे, पुन्हा पेरणे, देवाणघेवाण करणे, सामायिक करणे किंवा विकणे  याचा कायदेशीर अधिकार देतो. याचा अर्थ असा की कोणत्याही सार्वजनिक सरळ Bt वाण जो संकरित नाही, शेतकरी कोणतीही रॉयल्टी न देता कायदेशीरपणे बियाणे साठवू आणि पुन्हा पेरू शकतात. PPV&FR कायदा जगातील सर्वात प्रगतिशील शेतकरी-हक्क कायद्यांपैकी एक आहे.

शोकांतिका ही आहे की हा शक्तिशाली देशांतर्गत कायदा त्याच सरकारने दुर्लक्षित केला आहे जे शेतकऱ्यांना समर्थन देण्याचा दावा करतात. शेतकऱ्यांना कॉर्पोरेट संकरित परावलंबित्वात ढकलताना सार्वजनिक सरळ वाण दडपणे हे भारताच्या स्वतःच्या कायद्याचे उल्लंघन आहे.

अखिल भारतीय किसान सभेने सर्व कापूस उत्पादक शेतकरी, किसान संघटना आणि स्वयंसेवी संघटनांना या बियाणे अधिकार चळवळीत मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे – १८ मे रोजी परभणीतील खरीप मेळावा भारताच्या बीज सार्वभौमत्वाच्या लढाईत एक निर्णायक सार्वजनिक क्षण बनवण्यासाठी.

 

नोंद : या लेखातील सर्व प्रजाती, उत्पादन, आणि परवानग्यांची माहिती ICAR-केंद्रीय कापूस संशोधन संस्था (CICR) च्या २०२५ च्या वार्षिक अहवाल, PAU, VNMKV आणि GEAC च्या सार्वजनिक नोंदींवर आधारित आहे. प्रत्येक दाव्याचा स्रोत द्यायचा झाल्यास परिशिष्ट जोडले आहे. (आवश्यकता असल्यास लेखकाकडे उपलब्ध).

 

 

राजन क्षीरसागर

अध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा

कार्यालय अजोय भवन दिल्ली

संपर्क : 9860488860